मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या दळणवळणाला वेग देणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचे गुरुवारी लोकार्पण झाले. ‘अंधेरी पश्चिम–मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील चेंबूर मेट्रो स्थानक अखेर प्रवाशांसाठी खुले झाले असून, मंडाले–चेंबूर थेट मेट्रो प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर वाकोला–बीकेसी उड्डाणपूलही वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवास आता अवघ्या पाच ते दहा मिनिटांत करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर सायंकाळी पाच वाजता चेंबूर मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी सेवेत दाखल झाले. तर वाकोला–बीकेसी उड्डाणपूलही काही मिनिटांतच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
चेंबूर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेअखेरीस एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. तसेच सांताक्रूझ–चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला–बीकेसी उड्डाणपुलाचे कामही जूनमध्ये पूर्ण झाले होते. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जूनमध्येच सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र, लोकार्पणाचा मुहूर्त रखडल्याने प्रवाशांना या सुविधांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा अन्य पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या सूचनाही त्यांनी एमएमआरडीएला दिल्या.
२०२७ पासून वातानुकूलित लोकलचा टप्प्याटप्प्याने प्रवेश
मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असून, यंदा ६० ते ७० किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मेट्रोमधील आरामदायी वातानुकूलित प्रवासाच्या तुलनेत लोकलमधील गर्दी आणि गैरसोयींचा प्रवाशांना सामना करावा लागतो. मात्र, हे चित्र लवकरच बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत मेट्रोच्या धर्तीवर २३८ वातानुकूलित लोकल गाड्या २०२७ पासून टप्प्याटप्प्याने दाखल करण्यात येणार असून, मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल सेवा वातानुकूलित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बीकेसी–चुनाभट्टी उड्डाणपुलाला बाबासाहेब भोसले यांचे नाव
बीकेसीहून थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर पोहोचण्यासाठी एमएमआरडीएने बांधलेल्या १.६ किलोमीटर लांबीच्या बीकेसी–चुनाभट्टी उड्डाणपुलाचेही यावेळी नामकरण करण्यात आले. सुमारे २६१ कोटी रुपये खर्चाचा हा पूल नोव्हेंबर २०१९ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
या उड्डाणपुलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करून एमएमआरडीएने पुलाच्या नामकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हा पूल माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांच्या नावाने ओळखला जाणार आहे.
ठाणे–बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला वेग
ठाणे–बोरिवली प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून दुहेरी बोगदा उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील ठाणे लाँचिंग शाफ्टमधून ‘नायक’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनद्वारे भुयारीकरण सुरू आहे. आता याच लाँचिंग शाफ्टमधून दुसऱ्या ‘अर्जुना’ टीबीएमद्वारे भुयारीकरणास सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी ‘अर्जुना’ टीबीएम भूगर्भात सोडण्यात आली. त्यामुळे ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.
मुंबईतील मेट्रो, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या माध्यमातून शहरातील पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण दळणवळण अधिक वेगवान करण्याच्या प्रयत्नांना या प्रकल्पांमुळे बळ मिळणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

