मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या उद्यानांमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शीव येथील प्रतीक्षानगर परिसरातील माला उद्यानात बुधवारी सायंकाळी विश्रांतीसाठी बांधण्यात आलेल्या गझिबोचे छप्पर अचानक कोसळल्याने पाच ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. छप्पर कोसळल्यानंतर काही काळ वृद्ध नागरिक ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याने उद्यान परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने बाहेर काढून शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रतीक्षानगर परिसरात असलेल्या माला उद्यानात दररोज मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि विश्रांतीसाठी येतात. नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावे तसेच बसण्यासाठी काही वर्षांपूर्वी उद्यानात गझिबो उभारण्यात आला होता. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास काही ज्येष्ठ नागरिक या गझिबोखाली बसले होते. त्याचवेळी गझिबोच्या छताचा भाग अचानक खाली कोसळला.
अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गझिबोखाली बसलेले नागरिक छताच्या ढिगाऱ्याखाली अडकले. छप्पर कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर उद्यानातील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य करून जखमी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत धोंडीराम खोपकर (६५), गणपत आंबोले (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलीय (६५) आणि सुनीता मोरे (६५) हे पाच ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, उद्यानातील नागरिकांच्या विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या संरचनेची देखभाल आणि तिची सुरक्षितता तपासण्यात आली होती का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या गझिबोची वेळोवेळी पाहणी करण्यात आली होती की नाही, त्याच्या छताची स्थिती काय होती आणि दुर्घटनेपूर्वी त्यामध्ये कोणतेही तडे किंवा अन्य धोकादायक बाबी आढळल्या होत्या का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
मुंबईतील सार्वजनिक उद्याने ही ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांच्या विरंगुळ्याची आणि विश्रांतीची ठिकाणे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी उभारण्यात आलेल्या बांधकामांची नियमित सुरक्षा तपासणी आणि देखभाल करणे ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. या दुर्घटनेनंतर माला उद्यानातील इतर संरचनांचीही तातडीने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सार्वजनिक उद्यानातील संरचना अचानक कोसळून पाच ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याने पालिकेच्या देखभाल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने उद्यानातील सर्व गझिबो, शेड, बाके आणि इतर संरचनांची सुरक्षितता तपासून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे.

