मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जुलै महिन्याचे वेतन १० ऑगस्टपर्यंत जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. अखेर जुलै महिन्याचे वेतन ११ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना साधारणपणे दर महिन्याला ७ तारखेला वेतन अदा केले जाते. मात्र, यंदा प्रशासकीय प्रक्रियेला झालेला विलंब आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वेतन देण्यास काहीसा उशीर झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
एसटी महामंडळाकडून शासनाच्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्ती रकमेची माहिती दर महिन्याला वित्त विभागाकडे सादर केली जाते. जुलै महिन्याची माहितीही वेळेत सादर करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत प्राप्त न झाल्याने वेतन प्रक्रियेवर परिणाम झाला.
सरनाईकांचा वित्त विभागाकडे पाठपुरावा
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रतिपूर्तीच्या रकमेबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला असून, ११ ऑगस्ट रोजी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे वेतन जमा होणार आहे.
‘पगार वेळेत करा’, अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
वेतनाला विलंब झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होतो. बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्यास अतिरिक्त व्याज किंवा दंडाचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून एसटी प्रशासन आणि वित्त विभागाने प्रभावी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
भविष्यात वेतनाला विलंब नको
कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. भविष्यात वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे.

