सांगली प्रतिनिधी
विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सांगली जिल्हा पोलीस दलाने जप्त केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यामध्ये १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि २४ हजार ५०० किलो बेदाणा यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक पीडितांना मोठा दिलासा मिळाला.
खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुद्देमालाचे मालक आणि विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावणे आणि चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळवून देणे, हे पोलीस दलाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांकडून प्रभावी तपास केला जात आहे. जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांना परत दिल्याने नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होईल.
नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे काम उद्दिष्ट निश्चित करून करावे. महिनावार संबंधितांचा ऐवज परत करण्यासाठी पाठपुरावा करावा. गुन्ह्यातील मुद्देमाल परत मिळणे हा पीडितांसाठी केवळ आर्थिक दिलासा नसून, त्यांच्या मनातील विश्वास पुन्हा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, असेही शर्मा यांनी नमूद केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्ह्यांचा तपास ही पोलिसांची प्रमुख जबाबदारी असली तरी चोरीला गेलेली संपत्ती संबंधितांना परत मिळाल्यानंतरच पीडिताला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसतो; त्यामागे संबंधितांची भावनिक गुंतवणूक असते. काही वस्तूंना सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्वही असते. त्यामुळे मुद्देमाल परत करताना पीडितांच्या भावनांचाही सन्मान केला जातो.
अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे.
‘स्पेशल २६’ची आठवण करून देणारी घटना
कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांच्या घरात १४ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटातील ‘स्पेशल २६’ची आठवण करून देणारी घटना घडली होती. घरातील मुद्देमाल चोरीला गेल्यानंतर त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत अवघ्या दोन ते तीन दिवसांत मुद्देमाल हस्तगत केला.
या कार्यक्रमात डॉ. म्हेत्रे यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी त्यांनी तातडीने तपास करून मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी आभार मानले.

