मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाला आवश्यक ते पूर्ण पाठबळ आणि कठोर कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्याचे मुंढे यांनी सांगितले.
एफडीएमध्ये नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमक्या कोणत्या सूचना दिल्या होत्या, याबाबत मुंढे यांनी प्रथमच भाष्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ‘सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेनुसार राज्यात काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले.
“महाराष्ट्रात या क्षेत्रात अत्यंत चांगले काम करायचे आहे. या कामाचा थेट परिणाम शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे आणि सुरक्षित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेले पूर्ण पाठबळ आणि कारवाईबाबतच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,” असे मुंढे यांनी सांगितले.
दरम्यान, एफडीएमार्फत ४ ते ६ ऑगस्टदरम्यान राज्यभर विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. या तीन दिवसांच्या मोहिमेत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच विविध अन्नपदार्थांच्या गैरप्रकारांविरोधात एकूण ३१ धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत तब्बल २ कोटी ८२ लाख ९९ हजार ७७२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, २२ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीप्रकरणी १९ एफआयआर दाखल करण्यात आले. या कारवाईत २० लाख २९ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, मसाले आणि खाद्यतेल आदी अन्नपदार्थांशी संबंधित कारवाईत सुमारे २ कोटी ६२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरातील ६३ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ३८ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली, तर सात आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने निलंबित करण्यात आले.
मुंबईतही कारवाईचा धडाका कायम राहिला. दादर, अंधेरी, सांताक्रूझ आणि कुर्ला येथील चार खाद्य आस्थापनांचे स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटींमुळे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच, आयआयटी बॉम्बेतील काही हॉस्टेल मेसमध्ये आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आगामी काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणारे, प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणारे तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

