मुंबई प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे बेस्ट उपक्रमाचा ‘बेस्ट दिन’ साजरा होत असताना दुसरीकडे बेस्ट बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. मुलुंड चेक नाका परिसरात शुक्रवारी दुपारी बेस्ट बसच्या धडकेत पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जयश्री भानाजी परमार असे मृत महिलेचे नाव असून त्या पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
माहितीनुसार, नेरुळ बस स्थानकातून मुलुंड चेक नाका बस स्थानकाकडे येणारी बेस्ट बस मुलुंड चेक नाका येथील वाहतूक सिग्नलवर थांबली होती. त्यावेळी जयश्री परमार या रस्ता ओलांडत होत्या. दरम्यान, हिरवा सिग्नल लागताच चालकाने बस सुरू केली. यावेळी बसची धडक लागून त्या खाली पडल्या आणि बसच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली त्यांचे डोके आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर बस वाहकाने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर संबंधित बस मुलुंड पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून चालक व वाहक यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुलुंड पोलीस करत आहेत.

