नवी दिल्ली वृत्तसंस्था
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीची घोषणा करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचा दावा करत, आता देशभरात “क्या बोलती पब्लिक” ही जनसंवाद मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिक्षण, बेरोजगारी आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास हेच आगामी काळातील पक्षाचे प्रमुख मुद्दे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, “आमची विचारधारा ही संविधानाची विचारधारा आहे. या देशात शिक्षण घेणे म्हणजे अनेक कुटुंबांसाठी डोक्यावर कर्ज घेण्यासारखे झाले आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.”
ते म्हणाले की, सीजेपीच्या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली असून, आता लोक आपले प्रश्न निर्भयपणे मांडू लागले आहेत. “सामान्य माणसाच्या न्यायासाठी कोणी वेळ देत नाही. त्यामुळे आम्ही थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेद्वारे देशभर संवाद
आगामी काळात सीजेपी देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये “क्या बोलती पब्लिक” या मोहिमेअंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. या मोहिमेत शिक्षण हा केंद्रबिंदू असेल. शिक्षणाचा वाढता खर्च, विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता या विषयांवर जनजागृती केली जाणार असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.
बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न
देशातील बेरोजगारी हा सध्या सर्वात गंभीर प्रश्न असल्याचे सांगताना दीपके म्हणाले, “जंतर-मंतरवरील आंदोलनात मोठ्या संख्येने बेरोजगार युवक सहभागी झाले होते. देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आम्ही या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणार आहोत.”
त्यांनी आरोप केला की, देशाचे भविष्य अशा लोकांच्या हाती दिले जात आहे, ज्यांना शिक्षणाचे महत्त्वच समजत नाही. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन मुद्द्यांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारवर टीका
पत्रकार परिषदेत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “२०१४ मध्ये देशाला विकासाची मोठी स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र आजही बेरोजगारी आणि शिक्षणासारखे मूलभूत प्रश्न कायम आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, “कोर्टात जाऊन पक्ष चोरला जातो, त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित
दीपके यांनी सांगितले की, देशातील जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. मात्र त्यांच्या समस्या आणि अपेक्षांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. “तरुणांसाठी शिक्षण आणि बेरोजगारी हेच सर्वात मोठे प्रश्न आहेत. मात्र सत्ताधारी पक्ष केवळ हिंदू-मुस्लिम मुद्यांवर राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सीजेपी आता देशभरात जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार असून, त्यासाठी “क्या बोलती पब्लिक” ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे शिक्षण अधिक परवडणारे करण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.

