पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलात भ्रष्टाचार, अमली पदार्थांच्या रॅकेटशी संगनमत आणि शिस्तभंगाच्या घटनांविरोधात कठोर भूमिका घेतलेल्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थ तस्करांशी सातत्याने संपर्क ठेवणे, अवैध व्यवसायांना संरक्षण देणे, संरक्षणाच्या मोबदल्यात पैसे स्वीकारणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे या गंभीर आरोपांमध्ये दोषी ठरलेल्या पोलीस शिपाई नवनाथ कांतराम शिंदे याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालांमध्ये शिंदे याच्यावरील आरोप निर्विवादपणे सिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचे अंतिम आदेश जारी केले. पुणे पोलीस दलात गुन्हेगारांशी संगनमत करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे.
‘झिरो टॉलरन्स’चा स्पष्ट संदेश
पोलीस दलातील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने गुन्हेगारी, भ्रष्टाचार किंवा अमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंध ठेवल्यास त्याला कोणतीही पाठीशी घालण्याची भूमिका घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दलातील शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर दिला असून, गुन्हेगारांशी संगनमत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे धोरण सातत्याने राबवले जात आहे.
स्वारगेटला नियुक्ती; वसुली मात्र सहकारनगरमध्ये
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नवनाथ शिंदे याची नियुक्ती स्वारगेट पोलीस ठाण्यात असतानाही तो सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चालविणाऱ्यांशी संपर्कात होता. संबंधित व्यवसायांना पोलिसांची कारवाई होऊ नये, यासाठी संरक्षण देण्याच्या मोबदल्यात त्याने नियमित आर्थिक व्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
यामुळे केवळ शिस्तभंगच नव्हे, तर पोलीस दलाच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का बसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘एनबी’ म्हणजेच ‘नवनाथ भाई’; गांजा कारवाईतून उलगडले धागेदोरे
या प्रकरणाचा उलगडा ऑगस्ट २०२५ मध्ये सहकारनगर परिसरात झालेल्या गांजा जप्तीच्या कारवाईदरम्यान झाला. पुणे पोलिसांनी विशेष मोहिमेत सुमारे पाच किलो गांजा जप्त करून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तपासादरम्यान आरोपींपैकी एका व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये ‘एनबी’ या नावाने सेव्ह केलेला मोबाईल क्रमांक आढळून आला. तपास अधिक खोलवर गेल्यानंतर हा ‘एनबी’ म्हणजे ‘नवनाथ भाई’ असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मोबाईल क्रमांक पोलीस शिपाई नवनाथ शिंदे याचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाची दिशा बदलली.
यानंतर पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार, संपर्क आणि इतर पुरावे तपासले. त्यातून शिंदे हा ड्रग्ज रॅकेटमधील आरोपींच्या सातत्याने संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा; निलंबनानंतर विभागीय चौकशी
तपासात ड्रग्ज रॅकेटमधील आरोपींशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नवनाथ शिंदेविरुद्ध अमली पदार्थ आणि सायकोट्रोफिक पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आणि स्वतंत्र विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.
या चौकशीत सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांची उलटतपासणी करण्यात आली. तसेच मोबाईल संपर्क, आर्थिक व्यवहार, साक्षीदारांचे जबाब आणि इतर दस्तऐवजी पुराव्यांची पडताळणी करण्यात आली.
संरक्षणाच्या नावाखाली नियमित वसुली
विभागीय चौकशी अहवालात नमूद करण्यात आले की, शिंदे हा गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराशी संबंधित व्यक्तींशी सातत्याने संपर्कात होता. अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी संबंधितांकडून तो संरक्षणाच्या नावाखाली नियमित पैसे स्वीकारत होता.
याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्याचे वारंवार लेखी आदेश दिले असतानाही त्याने त्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उलट गुन्हेगारांना मदत करून त्यांना अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
अहवालात त्याचे वर्तन पोलीस दलाच्या प्रतिमेला गंभीर धक्का देणारे असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्तांची कठोर शिफारस
या प्रकरणाची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सविस्तर अहवाल सादर केला. त्यामध्ये नवनाथ शिंदे याच्यावरील सर्व आरोप प्राथमिक तसेच विभागीय चौकशीत सिद्ध झाल्याचे नमूद करण्यात आले.
त्याने वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केले, अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी व्यक्तींशी आर्थिक आणि वैयक्तिक संबंध ठेवले तसेच पोलीस कर्मचारी म्हणून अपेक्षित असलेल्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या गंभीर गैरवर्तनाची दखल घेत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ५ अंतर्गत शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली.
अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा अंतिम निर्णय
प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालांचा सखोल विचार करून अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी नवनाथ शिंदे याला सेवेतून बडतर्फ करण्याचे अंतिम आदेश जारी केले.
पुणे पोलीस दलातील भ्रष्टाचार, गुन्हेगारांशी संगनमत आणि शिस्तभंगाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही आणखी एक निर्णायक कारवाई असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही तिघांवर कारवाई
यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे यांना सेवेतून बडतर्फ केले होते.
महाविद्यालयाच्या एका प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विभागीय चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली होती.
आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
“शहरातील अमली पदार्थांचा व्यापार आणि इतर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात पुणे पोलिसांची ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका कायम आहे. खंडणी उकळणे, अवैध व्यवसायांना संरक्षण देणे किंवा अधिकारांचा गैरवापर करणे अशा कोणत्याही गैरकृत्यात पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे आढळल्यास ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यापुढेही दोषी कर्मचाऱ्यांवर सेवेतून बडतर्फीसह अत्यंत कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.


