नवी दिल्ली वृत्तसंस्था
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नुकताच राजीनामा द्यावा लागल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेल्या राजकीय अडचणी कमी होत नाहीत, असे चित्र आहे. त्यातच आता पक्षाचे आक्रमक आणि चर्चित राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘न्यूज १८’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पुनावाला यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपला राजीनामा पाठविला आहे. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाइलमधून ‘भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते’ हा उल्लेख हटविला. त्याऐवजी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन समर्थक’ एवढाच उल्लेख ठेवण्यात आला आहे. मात्र, इन्स्टाग्रामवरील प्रोफाइलमध्ये अद्याप राष्ट्रीय प्रवक्त्याचा उल्लेख कायम आहे.
My updated bio : pic.twitter.com/qGG5s9WMOG
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) July 30, 2026
सूत्रांच्या माहितीनुसार, शहजाद पुनावाला लवकरच आपल्या निर्णयाबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य राजीनाम्यामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण, विरोधकांवर आक्रमक शैलीत हल्लाबोल करत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रवक्त्यांमध्ये पुनावाला यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चांपासून ते सोशल मीडियापर्यंत ते भाजपची बाजू ठामपणे मांडताना दिसत होते.
विशेष म्हणजे, पुनावाला यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या काळात त्यांनी विशेषतः काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर सातत्याने टीकास्त्र सोडत पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यानही त्यांनी मोदी सरकारची बाजू जोरकसपणे मांडली होती.
मात्र, अशा महत्त्वाच्या नेत्याने अचानक पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची चर्चा असली तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.


