स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : खार पूर्व येथील सांसीवाडी परिसरात उघड्या घरातून दोन मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला निर्मलनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत गुन्ह्याची उकल केली आहे. विशेष म्हणजे चोरीस गेलेला १२ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी गौरी राजेश खारवा (वय ४०) यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २८ जुलै रोजी दुपारी २ ते रात्री ४ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांची मुले घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपली असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून चार्जिंगला लावलेले वनप्लस आणि रियलमी कंपनीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. त्यानंतर २९ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुमित राकेश सांसी (वय २६, रा. सांसीवाडी, खार पूर्व) याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नियमानुसार अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीसह इतर गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे यांनी केला. त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार खंडारे, वाघमारे, परदेशी तसेच पोलीस शिपाई भोगले, कदम आणि कोळी यांनी कारवाईत सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी तसेच पोलीस निरीक्षक पारटकर (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.


