स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : तब्बल १५ वर्षांपासून न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटपासून फरार असलेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी शिताफीने सापळा रचून विरारमधून अटक केली. न्यायालयात हजर राहण्याचे टाळत असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यात साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाला अखेर यश आले असून न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४९/२०१० अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४४, १४७, १४९, ३३२ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अयूब मोहम्मद सफात चौधरी (वय ३८), हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ६६ वे न्यायालय, अंधेरी यांनी त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आरोपी तब्बल १५ वर्षांपासून फरार होता.
दरम्यान, २९ जुलै रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी विरार (पश्चिम) येथील सपकाळे नाका परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपआयुक्त (पश्चिम परिमंडळ-३) दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मांडले यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नेत्रा मुळे, पोलीस अंमलदार नंदकिशोर सांडव आणि पोलीस हवालदार अरविंद होळकर यांनी सहभाग घेतला.


