उल्हासनगर प्रतिनिधी
उल्हासनगर शहराला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करत आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. उल्हासनगर-१ परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ च्या पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आशा गरड असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, अमृता गरड (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. अमृताचे एका दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रेमसंबंधाला तिच्या आईचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून आई आणि मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अमृता आणि तिची आई आशा यांच्यात प्रेमसंबंधाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. त्यावेळी घरातील अमृताचे वडील आणि तिचे दोन भाऊ झोपलेले होते. वाद वाढल्यानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. याचवेळी संतापाच्या भरात आई आशा गरड हिने दुपट्ट्याने अमृताचा गळा आवळल्याचा आरोप आहे.
या घटनेत अमृताचा मृत्यू झाला. घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ येथे धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू करून आरोपी आई आशा गरड हिला ताब्यात घेतले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
प्रेमसंबंधाला विरोधातून वाद विकोपाला
अमृताचे दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबीयांना होती. मात्र, या नात्याला आई आशा गरड हिचा विरोध असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याच मुद्द्यावरून रविवारी रात्री आई-मुलीमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तिच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप आहे.
अमृताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याच्या आरोपामुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ चे अधिकारी करत आहेत. अमृताच्या मृत्यूचे नेमके कारण, घटनेमागील परिस्थिती आणि या हत्येच्या प्रकरणातील अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


