राजकोट वृत्तसंस्था
मुंबईहून दुबईच्या दिशेने उड्डाण केलेल्या इंडिगोच्या विमानाच्या कार्गो होल्डमध्ये हवेत असतानाच धूर आढळल्याने राजकोट विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील १९४ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
इंडिगोचे 6E 1452 हे विमान मुंबईहून दुबईकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या खालच्या भागात असलेल्या कार्गो होल्डमध्ये धूर असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायलटने तातडीने राजकोट विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधला आणि विमान राजकोटकडे वळविण्यात आले.
विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी राजकोट विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली होती. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि सुरक्षा यंत्रणा धावपट्टीवर सज्ज ठेवण्यात आली होती. त्यानंतर विमानाने राजकोट विमानतळावर सुरक्षितपणे उतरणे केले.
लँडिंगनंतर विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राजकोट विमानतळाचे संचालक दिगंता बोरा यांनी सांगितले की, मुंबईहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या कार्गो होल्ड परिसरात धूर आढळल्याने विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
दरम्यान, विमानात धूर निर्माण होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंगनंतर तंत्रज्ञांच्या पथकाकडून विमानाची तपासणी सुरू असून, धूर नेमका कोणत्या कारणामुळे निर्माण झाला याचा शोध घेतला जात आहे.


