ठाणे प्रतिनिधी
ठाण्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून पाहिले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड बुधवारी कळवा येथील एका कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत विकासकामाचे भूमिपूजन झाले. या वेळी दोघांमध्ये झालेल्या मिश्कील संवादामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निवडणुकीच्या काळात एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, कळवा येथील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयी सकारात्मक सूर आळवला. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नगरसेवकांचा उल्लेख करत ‘इथे सर्व आपलेच नगरसेवक आहेत,’ असे म्हटले. त्यावर आव्हाड यांनी ‘आम्ही सुद्धा तुमचेच आहोत,’ असे सूचक वक्तव्य केले.
आव्हाड यांच्या या वक्तव्याला शिंदे यांनीही तत्काळ उत्तर दिले. ‘आपले म्हणजे आपलेच. मगाशी सांगितले ना, आपण युतीचे आहोत,’ असे शिंदे म्हणाले. यावेळी कळवा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांचाही उल्लेख करत तेही ‘आपलेच’ असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय संघर्ष ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातही विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर शिंदे आणि आव्हाड एकाच व्यासपीठावर येऊन विकासकामांसाठी परस्पर सहकार्याची भूमिका मांडताना दिसल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
‘निधीची कमतरता भासू देणार नाही’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांचा वारंवार उल्लेख करत कळवा-मुंब्रा परिसरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. ‘आव्हाडसाहेब तुम्ही मंत्री असताना कोणतीही फाइल घेऊन आलात की मी लगेच सही करायचो. रात्री अडीच वाजताही तुमच्या फाइलवर सही केली आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.
कळवा येथे नाट्यगृह उभारण्याच्या मागणीचाही शिंदे यांनी उल्लेख केला. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विकासकामांच्या मुद्द्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करण्याचा सूर शिंदे यांच्या भाषणातून दिसून आला.
‘राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी लोकहितासाठी एकत्र काम करू’
जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या भाषणातून शिंदे यांच्यावर मिश्कील टोले लगावले. ‘हल्ली एकनाथ शिंदे यांचा हात माझ्यासाठी निधी देण्यात मोकळा झाला आहे. मी एवढा निधी आणला की त्यांच्या तीन आमदारांना मिळूनही एवढा निधी आणता आला नाही,’ असे आव्हाड म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांनी कधीही माझ्या कामात अडथळा आणला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात काही गोष्टींचे कौतुक करणे आवश्यक असते, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्या काही निर्णयांचे कौतुक केले.
‘राजकीयदृष्ट्या आपण वेगवेगळ्या वाटेवर असलो, तरी लोकांच्या हितासाठी हातात हात घालून काम करू,’ असे सूचक वक्तव्य आव्हाड यांनी यावेळी केले.
ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे आणि आव्हाड हे दोन परस्परविरोधी ध्रुव मानले जातात. मात्र, विकासकामांच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच मंचावर आले आणि एकमेकांबद्दल सकारात्मक भूमिका मांडताना दिसले. त्यामुळे आगामी काळात ठाण्याच्या राजकारणात या संवादाचे कोणते राजकीय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


