ठाणे प्रतिनिधी
उल्हासनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला जात असल्याच्या आरोपातून एका २८ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.
नित्या राय असे मृत विवाहितेचे नाव आहे. नित्याचा सुमारे पाच वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरव राय याच्याशी विवाह झाला होता. नित्या हीदेखील उच्चशिक्षित होती. विवाहाच्या वेळी नित्याच्या वडिलांनी हुंडा दिल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले आणि सासरच्या मंडळींकडून नित्याला माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
‘माहेरहून पैसे घेऊन ये’, असा सातत्याने तगादा लावला जात असल्याने नित्या मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अखेर या जाचाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. उच्चशिक्षित असूनही वैवाहिक आयुष्यातील कथित छळामुळे तिने जीवन संपवल्याने या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नित्याचा पती गौरव राय, सासू आणि आजी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती गौरव राय याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हुंडा देऊनही छळाची परंपरा संपत नसल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही पैशांसाठी विवाहित महिलांवर मानसिक दबाव आणला जात असल्याच्या घटना घडत असल्याने समाजमन हादरले आहे. विशेषतः नऊ महिन्यांच्या चिमुकलीला मागे ठेवून नित्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे राय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हुंड्यासाठी होणारा मानसिक आणि शारीरिक छळ रोखण्यासाठी कायदे असतानाही अशा घटना घडत असल्याने त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. नित्याच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, छळाचे स्वरूप आणि पैशांच्या मागणीसंदर्भातील आरोप यांचा तपास पोलीस करत आहेत.

