ठाणे प्रतिनिधी
ठाणे : सोशल मीडियावरील ‘रिल्स’ पाहून ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुंबईतील तीन तरुणांचा मलंगगडावर जीव धोक्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील मामा-भांजे टेकडी परिसरात चढाई केल्यानंतर परतीचा मार्ग चुकल्याने ते उंच डोंगरावर अडकून पडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, हिल लाईन पोलीस, अंबरनाथ अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून मध्यरात्री त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सिंग (२४), मंगेश प्रजापती (२५) आणि गुरुप्रसाद विश्वकर्मा (रा. मालाड पूर्व, मुंबई) हे तिघे मित्र रविवारी मलंगगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. इन्स्टाग्रामवरील आकर्षक रिल्स पाहून त्यांनी मामा-भांजे टेकडी गाठली. मात्र परतीच्या वेळी अंधार पडल्याने आणि मार्ग अत्यंत धोकादायक असल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. अखेर त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने घसरडा मार्ग, उंच डोंगररांग आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकाने अथक प्रयत्न करून मध्यरात्री तिन्ही तरुणांची सुखरूप सुटका केली.
या घटनेमुळे सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हायरल व्हिडिओंच्या प्रभावाखाली तरुण धोकादायक ठिकाणी जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाकडून वारंवार इशारे देऊनही पर्यटक सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब चिंताजनक असून, मलंगगड परिसरातील प्रतिबंधित आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


