ठाणे प्रतिनिधी
ठाणे : नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या मार्गातील बांदल चाळ हटविण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, चाळीत राहणाऱ्या ५० कुटुंबांचे आधी योग्य पुनर्वसन करण्यात येईल आणि त्यानंतरच चाळीचे निष्कासन केले जाईल, अशी ग्वाही विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांनी दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या मार्गात गेल्या सुमारे ६० वर्षांपासून असलेली बांदल चाळ येत आहे. या चाळीत सुमारे ५० कुटुंबे वास्तव्यास असून, रेल्वे प्रशासनाने त्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर केळकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
गुरुवारी आमदार संजय केळकर यांनी बांदल चाळीतील रहिवाशांसह विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना आणि अन्य रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांचे आधी योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे आणि त्यानंतरच चाळीचे निष्कासन करण्यात यावे, अशी मागणी केळकर यांनी केली.
रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केल्याने बांदल चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच चाळ हटविण्याची कार्यवाही होणार असल्याने नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.

