नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची व्याप्ती आता देशभर वाढविण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केली आहे. पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात २४ जुलै रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात येणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.
सीजेपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक डिजिटल पत्रक प्रसिद्ध करून देशभरातील विद्यार्थी आणि युवकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘Every District. One Day. One Demand.’ असा संदेश या पत्रकातून देण्यात आला आहे. त्यामुळे २४ जुलै रोजी देशातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आणि युवकांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाचे आवाहन
अभिजीत दिपके यांच्या आवाहनानंतर सीजेपीने आंदोलनाचा विस्तार करण्याची भूमिका घेतली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शांततापूर्ण आंदोलन आयोजित करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाने केले आहे.
सोशल मीडियावर पत्रक व्हायरल
या देशव्यापी आंदोलनासंदर्भातील डिजिटल पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी शांतता आणि शिस्त कायम ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या सार्वजनिकपणे मांडण्यासोबतच यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये पोलिस कारवाईला सामोरे जावे लागलेल्या आंदोलकांप्रती एकजूट व्यक्त करण्याचे आवाहन सीजेपीने केले आहे.
आंदोलनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
आंदोलनाचे नियोजन आणि आयोजन सुरळीतपणे व्हावे, यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी), प्रचार साहित्य तसेच निवेदनाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सीजेपीने म्हटले आहे. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘इन्कलाब जिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांसह देशभरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीच्या पत्रकातून करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आता २४ जुलै रोजी देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


