
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व सामान्य जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
यामुळे करदात्यांच्या पैशांची बचत होईल आणि त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे असतील. ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील चांगली बातमी आहे. वाढत्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल ज्यामुळे भारतीय बाजारपेठेलाही चालना मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कराबाबत मोठी घोषणा करत म्हटले की, ‘आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पूर्वी 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता. आता 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. तसेच, 15-20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर लागेल.
सर्वसामन्यांना मोठा दिलासा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या मोठ्या घोषणेनंतर मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. पण जर उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्त असेल तर कर भरावा लागणार आहे.
गेल्या वर्षीही कर सवलत दिली होती
गेल्या 2024 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टॅंडर्ड डिडक्शनती मर्यादा वाढवून नवीन कर व्यवस्थेत मोठी भेट दिली होती. ही मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली. आता पुन्हा एकदा मध्यमवर्गाला भेट देण्यासाठी नवीन कर स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
किसान क्रेडिट कार्डची मर्यादाही वाढली
केंद्र सरकारसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून 5 लाख केली आहे. यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची कमाल मर्यादा 3 लाख रुपये होती. मात्र आता ती 3 लाखांना वाढवून 5 लाख झाली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. खासकरुन अल्प भू धारक शेतकऱ्यांना आता कमी दरात जास्त कर्ज मिळणे सुकर होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे.