मुंबई प्रतिनिधी
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्यांचा ‘जॅकपॉट’ मिळणार आहे. चार दिवस शाळा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुका, संप, सार्वजनिक सुट्टी आणि रविवारामुळे हा ‘लाँग विकेंड’ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
२ डिसेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. मतदान केंद्रांसाठी शाळांचा वापर होत असल्याने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
५ डिसेंबर : शिक्षकांचा टीईटी अनिवार्यता विरोधातील संप
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने अद्याप या निर्णयाविरोधात अपील दाखल न केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली असून या दिवशी राज्यातील शाळा बंद राहतील.
६ डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
मुंबई व उपनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसेच शाळा–महाविद्यालयांना ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा सार्वजनिक अवकाश जाहीर केला जातो.
७ डिसेंबर : रविवारची नियमित सुट्टी
शनिवारचा सार्वजनिक अवकाश आणि शुक्रवारचा संप यामुळे आधीच सलग दोन दिवस सुट्टी मिळतेच; त्यात ७ डिसेंबरचा रविवार आल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांचा ‘लाँग विकेंड’ मिळणार आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या सलग सुट्ट्यांमुळे विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.


