
नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
या घोषणांपैकी एक घोषणा ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी महत्त्वाची आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या 5 लाख महिलांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात एक नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करुन स्वावलंबी करण्यात येणार आहे. या महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिलांना हमीशिवाय काही किरकोळ अटींवर कर्ज देण्यात येईल. जेणेकरून या महिला स्वतःचे लघु आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील. या सरकारी योजनेअंतर्गत, महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या टर्म लोनची सुविधा मिळेल, ज्याचा फायदा 5 लाख महिलांना होईल. यासोबतच या महिलांना त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल प्रशिक्षण, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांशी कनेक्टिव्हिटी देखील दिली जाईल.
ही योजना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणार नाहीये तर सामाजिक आणि आर्थिक समानता देखील सुनिश्चित करेल. ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे. तसेच त्यांच्या व्यावसायिक क्षमता विकसित कराव्यात अशी सरकारची ईच्छा आहे. या उपक्रमामुळे महिला उद्योजकांना स्टार्टअप इंडिया आणि मुद्रा योजना सारख्या इतर सरकारी योजनांशी जोडले जाईल, जेणेकरून त्यांना अधिक फायदे मिळू शकतील असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
एमएसएमई आणि स्टार्टअपसाठी बजेट
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी स्टार्टअप बजेट 10 कोटी रुपयांवरून 20 कोटी रुपये केले आहे. यामुळे फूटवेअरसह अनेक क्षेत्रांना चालना मिळेल. स्टार्टअप्ससाठी नवीन फंड ऑफ फंड्स स्थापन केला जाणार आहे. 10,000 कोटी रुपयांचे नवीन योगदान हे सध्याच्या 10 हजार कोटी रुपयांच्या सरकारी योगदानाव्यतिरिक्त आहे. 5 लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमातींना पहिल्यांदाच उद्योजक बनण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली जाणार आहे. सरकार पाच लाख पहिल्यांदाच व्यवसाय करणाऱ्या महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांना 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.