मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरात पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर एका पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ओशिवरा पोलिसांनी आरोपी पतीला घटनास्थळावरून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा पती हे ओशिवरा पोलीस ठाण्याजवळील सिग्नल परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापाच्या भरात पतीने रस्त्यालगत पडलेला मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यावर व गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेली महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
घटना पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ घडल्याने माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


