
मुंबई प्रतिनिधी
बँकेतील विविध कामांसाठी राखीव ठेवलेल्या निधीवर बँकेतील अधिकाऱ्यांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी एमआयडीसी येथील इंडसइंड बँकेच्या शाखेत घडला आहे.
पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातलं जातं मात्र कुंपणानेच शेत खाल्लं अशी एक मराठीत म्हण आहे. असाच प्रकार एका बँकेत घडलाय मुंबईतल्या अंधेरी विभागातल्या एका बड्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेला सुमारे दोन कोटीहून अधिक रकमेला फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर माहिती अशी की
सहा अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बँकेच्या नावे असलेल्या बँक खात्यांमधून आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यांवर सुमारे दोन कोटी रुपये वळते केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर, बँक व्यवस्थापकांच्यातक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेची एकूण सहा खाती असून विविध कामांसाठी या खात्यामधील निधीचा वापर केला जातो. या सहा खात्यांमधील निधी वापरण्याची परवानगी बँकेच्या वेगवेगळ्या विभागांतील 15 अधिकाऱ्यांना आहे. बँकेच्या सेंट्रल फ्रॉड मॉनिटरिंग युनिटने केलेल्या चौकशीमध्ये, 3 एप्रिल 2023 ते 4 नोव्हेंबर 2024 या कालावधीत बँकेच्या खात्यांमधून सुमारे दोन कोटी पाच लाख रुपये संशयास्पदरीत्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळते करण्यात आल्याचे दिसून आले.
अधिक चौकशी केली असता, सिद्धेश पटनायक या अधिकाऱ्याने त्याच्यासह काम करणाऱ्या विकी शिंदे याच्या पासवर्डचा वापर केल्याचे दिसून आले. त्याने शिंदे याचा लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर करून अजय यादव, ऋषभ यादव आणि श्यामसुंदर चौहान यांच्या बँक खात्यांवर रक्कम वळती केली आणि नंतर त्यांना काही रक्कम देत उर्वरित रक्कम रोख स्वरूपात घेतली.
आपले इतर सहकारी गैरव्यवहार करत असल्याचे सागर मिश्रा या अधिकाऱ्याच्या लक्षात आले. या गैरव्यवहाराबाबत तोंड बंद ठेवण्यासाठी त्याने सिद्धेशकडे पैशांची मागणी केली, त्यानुसार, सागर हा कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांच्या नावाने फाइल द्यायचा आणि त्यामध्ये बँक खात्यांचा तपशील नमूद करायचा. त्यानुसार सिद्धेश याने सागरला 29 लाख 35 हजार रुपये पाठविल्याचे दिसून आले आहे.
या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून बँकेच्या सहा खात्यांमधून एकंदरीत दोन कोटी पाच लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळते केले. बँकेच्या चौकशीत हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर अधिकाऱ्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली.
या घटनेमुळे बँकेच्या अंतर्गत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार कसा झाला, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.