पुणे प्रतिनिधी
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्याच पोलिसांनी खंडणी उकळण्यासाठी एका कुटुंबाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. कामशेत परिसरात घडलेल्या या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा जणांवर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यापैकी पाच पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पोलीस दलाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचे रक्षण आणि गुन्हेगारांचा नायनाट करण्याची शपथ घेणाऱ्या यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांनीच गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात अपहरण, खंडणी, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ड्रग्जचे नाव सांगून गाडी अडवली
मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात राहणारे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद आझमी हे आपल्या कुटुंबीयांसह ५ जुलै रोजी फिरण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास कामशेत परिसरात त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. स्वतःला पोलिस असल्याचे सांगत आरोपींनी “तुमच्या गाडीत ड्रग्ज आहेत” असा आरोप केला. तपासाच्या नावाखाली त्यांनी सर्वांना वाहनातून खाली उतरवले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपींनी कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत ठेवले. या काळात पीडितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पैसे दिल्यास सर्वांना सुरक्षित सोडू, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.
स्मार्ट वॉच ठरले जीवदान
या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाची भूमिका कुटुंबातील एका अल्पवयीन मुलाच्या प्रसंगावधानाने निभावली. आरोपी तळेगाव परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी थांबले असताना त्या मुलाने हातातील स्मार्ट वॉचच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना गुप्त संदेश पाठवला. आपण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्याने दिली.
हा संदेश मिळताच नातेवाईकांनी तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण घटना सांगत मदतीची विनंती केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान या प्रकरणामागे पुणे ग्रामीण पोलीस दलातीलच काही कर्मचारी असल्याचे समोर आले आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हस्तक्षेप करून तपासाला गती दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून वरिष्ठ अधिकारीही संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
पाच पोलिस अटकेत
या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, एफआयआरमध्ये सर्व आरोपींची नावे नमूद नसल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील आरोपींचा समावेश आहे –
– पोलिस नाईक अमोल वायकर
– पोलिस कॉन्स्टेबल अमोल ननावरे
– पोलिस कॉन्स्टेबल तुषार धावरे
– वॉर्डन किसन बोंबळे
– वॉर्डन नितेश चव्हाण
– वॉर्डन तुषार घाडगे (प्रकरणातील आरोपी)
पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
या घटनेनंतर पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच कायदा हातात घेतल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात अपहरण, खंडणी, बेकायदेशीर कैद, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.


