पुणे प्रतिनिधी
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पुण्यात माणुसकीचा प्रेरणादायी प्रसंग घडला. पालखी सोहळ्यादरम्यान अचानक फिट येऊन रस्त्यावर कोसळलेल्या एका वारकऱ्याचे प्राण पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्व स्तरांतून डॉ. भाजीभाकरेंच्या सेवाभावाचे कौतुक होत आहे.
आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होत असताना नाना पेठ, भवानी पेठसह संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सतर्क होते.
याचवेळी पालखी मार्गावर चालत असलेल्या एका वारकऱ्याला अचानक फिट आली आणि तो रस्त्यावर कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र बंदोबस्तासाठी घटनास्थळी उपस्थित असलेले DCP डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वारकऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली.
डॉ. भाजीभाकरेंनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून संबंधित वारकऱ्याला तातडीने प्रथमोपचार दिले. त्याचवेळी सहकाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावण्यात आली. वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवक चोवीस तास कार्यरत आहेत. गर्दीच्या वातावरणात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, या घटनेत त्याची प्रभावी प्रचिती आली.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कर्तव्याबरोबरच माणुसकीची जाणीव जपत एका वारकऱ्याचा जीव वाचविल्याबद्दल डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालखी सोहळ्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या जीवितरक्षणासाठीही पोलीस तितक्याच संवेदनशीलतेने सज्ज असल्याचे या घटनेतून सिध्द झाले आहे.


