
मुंबई प्रतिनिधी
मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. काही प्रवासी तर तिकीट मागितल्यानंतर तिकीट तपासनीसासोबत हुज्जतही घालत बसतात.
टीसीला प्रवाशांकडून मारहाण झाल्याच्याही अनेक घटना घडला आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या टीसींना ड्युटीवर असताना वापरण्यासाठी बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे टीसी काम करत असताना एखादी अनुचित घटना घडली तर त्याचं रेकॉर्डिंग करणं शक्य होणार आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी या बॉडी कॅमेरामधील रेकॉर्डिंगचा उपयोग होईल.
टीसींच्या बॉडी कॅमेराचा कसा होणार उपयोग ?
विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींना पकडल्यावर ते अनेकदा दंड भरण्यासाठी टाळाटाळ करतात. दंडावरुन त्यांचे टीसीसोबत वाद होतात. काही वेळा हे प्रकरण मारहाणीपर्यंतही जातं. त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून टीसींसाठी बॉडी कॅमेरा उपलब्ध करण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाद घातल्यास रेल्वे कायदा 1989 च्या कलम 140 नुसार रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुढील कारवाईसाठी वापरता येईल.
रेल्वे स्टेशनवर प्री कस्टडी एरिया
विनातिकीट प्रवास करत असताना पकडलं गेल्यावर प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिला तर त्याला प्लॅटफॉर्मवर प्री कस्टडी एरियामध्ये नेलं जाईल. तिथे त्याला नियमांची माहिती देण्यात येईल. त्यानंतरही प्रवासी दंड भरण्यास नकार देत असेल तर त्याला मेमो जारी केला जाईल. त्यानंतर त्याला आरपीएफकडे सुपूर्द केलं जाईल. अंधेरी आणि बोरिवली रेल्वे स्टेशनवर प्री कस्टडी एरिया तयार करण्यात आला आहे. काही महिन्यांमध्ये इतर रेल्वे स्टेशनवरही अशी व्यवस्था केली जाईल.
विनातिकीट प्रवाशांकडून 32.16 लाख रुपयांचा दंड वसूल
टीसीच्या बॉडी कॅमेरामुळे तिकीट तपासणीत पारदर्शकता येईल. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर वचक ठेवता येईल, असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. या बॉडी कॅमेराची चाचणी करण्यासाठी 23 जानेवारीपासून मोहीम राबवण्यात आली होती. काही टीसींना बॉडी कॅमेरे देण्यात आले होते. बॉडी कॅमेरे देण्यात आल्यानंतर सात हजारपेक्षा जास्त प्रवाशांकडून 32.16 लाख इतका दंड वसूल करण्यात आला.