
मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा युवासेनेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख संपूर्ण देशभरात पसरली. ‘सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी’ हे त्यांचे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त हा दिवस ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या संकल्पनेद्वारे युवासेनेतर्फे राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या ६१ सन्मानमूर्तींमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटीत कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी हा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केले.