मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यावर दिसून आला आहे. गेल्या २४ तासांतील दमदार पावसामुळे धरणांतील एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून तो २८.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. अवघ्या एका दिवसात साठ्यात सुमारे १२ टक्क्यांची भर पडल्याने पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
रविवारपासून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दळणवळण विस्कळीत झाले. बोरघाट परिसरात रेल्वेमार्गावर दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दुसरीकडे पालघर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले, तर मुंबई शहर आणि उपनगरांनाही मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. याच पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा आता २८.९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धरणनिहाय पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी अप्पर वैतरणा धरणात १२.२५ टक्के, मोडकसागरमध्ये ५२.२२ टक्के, तानसा धरणात ४२.८५ टक्के, मध्य वैतरणा धरणात २६.१२ टक्के, भातसा धरणात २४.९२ टक्के, विहार धरणात ९८.९८ टक्के, तर तुळशी धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. विहार आणि तुळशी ही धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र असून उर्वरित मोठ्या धरणांमध्येही पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे.
पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे
भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भरतीच्या लाटांचाही धोका
मुसळधार पावसाबरोबरच समुद्रात उंच भरती येण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास तसेच ८ जुलै रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास सुमारे चार मीटर उंचीच्या भरतीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
ऑरेंज अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे वाहतूक, रेल्वे आणि जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी त्याच पावसामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या सात धरणांतील पाणीसाठ्यात झालेली मोठी वाढ ही शहरासाठी दिलासादायक बाब ठरत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील जलसाठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.


