मुंबई प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेली मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ सोमवारी रात्री तांत्रिक तपासणीनंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतील केवळ दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या असून, उर्वरित दोन लेन तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
🚨 IMPORTANT UPDATE
✅ Traffic has resumed on the Pune–Mumbai Connecting Link Road. Vehicular movement has been restored after completion of extensive safety operations.
Despite relentless monsoon conditions, including heavy rainfall, strong winds and low visibility, MSRDC… pic.twitter.com/LCRirbWao0
— MSRDCofficial (@MSRDC_official) July 6, 2026
रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका द्रुतगती मार्गाला बसला. लोणावळा परिसरात अवघ्या २४ तासांत ६२५ मिमी, तर खोपोली परिसरात ३२३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली. तसेच खालापूर येथील फूड मॉल परिसरात महामार्गावर पाणी साचल्याने काही काळ दोन्ही दिशेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ संबंधित मार्गिका बंद करून बचाव आणि साफसफाईचे काम हाती घेतले. बोगद्याबाहेरील कमानीलगत मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा हटविण्यासाठी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दिवसभर मोहीम राबविण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरड हटविल्यानंतर अभियंते आणि तज्ज्ञांनी मार्गाची पाहणी करून संरचनात्मक सुरक्षिततेची खात्री केली. त्यानंतर सोमवारी रात्री वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र डोंगरावरून अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोनच लेन वाहतुकीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर उर्वरित लेनही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
दरम्यान, खालापूर येथील फूड मॉल परिसरात साचलेले पाणीही ओसरल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. दिवसभर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला.
दरड कोसळल्यानंतर या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले. त्यानंतर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. प्रकल्पाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून करण्यात आली.


