मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि पक्षातील संभाव्य अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी ७ वाजता ‘मातोश्री’वर पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. पक्षातील संघटनात्मक स्थिती, आमदारांशी संवाद आणि आगामी राजकीय रणनीती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेतील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षबांधणीवर भर दिला होता.
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन आहिर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. आहिर यांची आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ओळख असल्याने या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले गेले.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही आमदारांबाबत विविध राजकीय चर्चा सुरू असून, त्यात किती तथ्य आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पक्षातील एकजूट कायम ठेवण्यासाठी आणि आमदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
बैठकीत पक्षाची पुढील भूमिका, संघटनात्मक बांधणी, तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चेदरम्यान ‘मातोश्री’वर अशीच बैठक घेण्यात आली होती.
आजच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात आणि बैठकीनंतर पक्षाकडून कोणते राजकीय संदेश अथवा निर्णय जाहीर होतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


