मुंबई प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्यात आली असून राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. हवामान, पूरस्थिती किंवा बचावकार्याबाबतची माहिती केवळ शासन, जिल्हा प्रशासन आणि भारतीय हवामान विभागासारख्या अधिकृत यंत्रणांकडूनच घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाचा १०७० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच ९३२१५८७१४३ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवरही नागरिक थेट संपर्क साधू शकतात. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत असून त्यासाठी १०७७ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना, पोलीस, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य पूरग्रस्त आणि दरडप्रवण भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारीही करण्यात आली आहे.
विशेषतः डोंगराळ आणि दरडप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचनांना सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधावा. मदत कार्यासाठी राज्य शासनाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


