मुंबई प्रतिनिधी
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मानखुर्द परिसरात मोठी दुर्घटना घडली. जनता नगर येथील तळमजला अधिक तीन मजली चाळीचा एक भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
VIDEO | Mumbai: A multi-storey 'chawl' collapses in Mankhurd amid heavy rains. Rescue operations on.
(Source: Third Party)#Mumbai #Mankhurd pic.twitter.com/OswY1757XH
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2026
ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास मानखुर्दमधील हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात घडली. चाळीचा भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश रहिवासी घरातच असल्यामुळे दुर्घटनेची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री ९.०७ वाजता अग्निशमन दलाने या घटनेला ‘एल-१’ स्तरावरील आपत्ती घोषित करून शोध व बचाव मोहीम सुरू केली.
परिसरातील अरुंद गल्ल्यांमुळे बचावकार्यात सुरुवातीला अडथळे आले. मात्र, जवानांनी ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
शताब्दी रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या पाच जणांना रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहावर पोहोचली. मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका जखमीवर उपचार सुरू असून मृत आणि जखमींची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शोधमोहीम सुरू आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.


