मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, उपनगरांसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची नोंद होत असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने सर्व शासकीय, खासगी, अनुदानित तसेच पालिका शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत आणि कोणतीही दुर्घटना टाळता यावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी असली तरी मुंबईतील शासकीय तसेच खासगी कार्यालयांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. आवश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याबरोबरच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
यापूर्वी, पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली होती. आता मुंबईतही त्याच धर्तीवर खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे.


