मुंबई प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यव्यापी ‘राम रक्षा’ आंदोलनाची सुरुवात रविवारी मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिरात महाआरतीने केली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत, “आमच्या हातात हनुमानाची मशाल आहे. तुमच्या अन्यायाची लंका खाक केल्याशिवाय ती शांत बसणार नाही,” असा इशारा दिला.

मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक आंदोलनात सहभागी झाले. खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भगवा सदरा परिधान करून उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत हिंदुत्व, राम मंदिर आणि कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत, “आम्ही कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत. हिंदू भोळा असू शकतो; मात्र मूर्ख नाही. मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाही,” असे सांगितले.
राम मंदिरासाठी कारसेवकांनी बलिदान दिल्याची आठवण करून देताना त्यांनी मंदिराला अर्पण झालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. “राम मंदिराला दिलेले दान कुठे गेले? शिवसेनेने दिलेली चांदीची वीट कुठे आहे? हिंदूंच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच, “आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. राम सर्वांचा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा निष्पक्ष तपास पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत ठाकरे म्हणाले, “राम रक्षा आंदोलन ही भर पावसात पेटलेली ठिणगी आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. “राम मंदिराच्या आंदोलनासाठी अनेकांनी त्याग केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्वाचा वापर सत्तेसाठी करणाऱ्यांविरोधात शिवसेनाच ठामपणे प्रश्न विचारू शकते,” असे ते म्हणाले.
केदारनाथ, महाकाल आणि बद्रीनाथ मंदिरांबाबत विविध स्तरांवर झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपांचाही उल्लेख करत धार्मिक संस्थांतील आर्थिक व्यवहार पारदर्शक असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व्यवस्थापनात कथित अनियमितता आणि निष्काळजीपणा झाल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्राथमिक चौकशीत समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. तपास यंत्रणांनी काही संशयितांना अटक केल्याची माहिती समोर आली असून, ट्रस्टमधील काही पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे या प्रकरणाची देशभरात राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.


