मुंबई प्रतिनिधी
पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी)मार्फत चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
नियम २६० अंतर्गत चर्चेत सहभागी होताना परब यांनी नाशिक जिल्ह्यासाठी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २,२७० कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदा काढण्यात आल्याचे सांगितले. मुख्य अभियंता प्रशांत अवटी आणि एका कंत्राटदाराने संगनमत करून १६ कंपन्यांची ‘रिंग’ तयार केल्याचा आरोप त्यांनी केला.
२०१८ च्या शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन करून विशिष्ट कंत्राटदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा परब यांनी केला. काही निविदा वाढीव दराने मंजूर करण्यात आल्याचा तसेच प्रक्रियेत उच्च दर्जाच्या कंपन्यांचा सहभाग नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
कामे पूर्ण होण्यापूर्वीच काही रस्त्यांवर तडे गेल्याचा दावा करत, आणखी सुमारे १,३०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित निविदांमध्येही अनियमितता होण्याची शक्यता असल्याचे परब यांनी म्हटले. “संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहात, किमान देवाला तरी सोडा,” अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
याच चर्चेदरम्यान मुंबई महानगरपालिकेतील विकासनिधीच्या वाटपात पक्षनिहाय दुजाभाव होत असल्याचा आरोपही परब यांनी केला. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांना कमी निधी, तर सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागांना अधिक निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सभागृहात उत्तर देताना कुंभमेळ्यासाठीची निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडल्याचे सांगितले. रस्त्यांच्या गुणवत्तेची चार स्तरांवर तपासणी करण्यात येत असून, विरोधकांनी केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


