मुंबई प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मे २०२६ रोजी मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आले होते. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे ३० मिनिटांनी कमी झाला असून वाहनचालकांकडून या प्रकल्पाचे स्वागत करण्यात आले होते. मात्र, वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच या मार्गावर खड्डे पडल्याचे समोर आल्याने प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मिसिंग लिंकवरील काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग उखडून किरकोळ खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. या खड्ड्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नव्याने बांधलेल्या महामार्गाची अशी अवस्था झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) खड्डे पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, हे खड्डे मोठ्या प्रमाणावर नसून घाट परिसरातील अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित ठिकाणी तातडीने पॅचवर्क करून खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा देखील एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे. तसेच वाहनांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
तथापि, उद्घाटनानंतर इतक्या कमी कालावधीतच रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डे पडल्याने देखभाल व्यवस्था आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे साहित्य आणि हजारो कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या प्रकल्पात पहिल्याच मान्सूनमध्ये अशा समस्या समोर आल्याने तज्ज्ञांकडूनही याची गंभीर दखल घेतली जात आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने मिसिंग लिंक प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पात खंडाळा-लोणावळा परिसरातील टायगर व्हॅलीवर सुमारे ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात आला असून, त्याचे खांब सुमारे १८२ ते १८४ मीटर उंच आहेत. वाढत्या वाहतुकीचा विचार करून हा पूल आठ पदरी, म्हणजे प्रत्येक दिशेला चार मार्गिकांचा, बांधण्यात आला आहे.
प्रकल्पामुळे जुन्या घाटमार्गावरील वळणे आणि चढ-उतार टाळले गेले असून प्रवास अधिक जलद झाला आहे. मात्र, पहिल्याच पावसात समोर आलेल्या या खड्ड्यांमुळे प्रकल्पाच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी मान्सूनमध्ये अशा प्रकारच्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.


