मुंबई प्रतिनिधी
मुंबईत शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांत शहरात सरासरी २८ मिमी, पूर्व उपनगरात ६६ मिमी तर पश्चिम उपनगरात ६३ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पाऊस आणि दुपारी आलेल्या समुद्राच्या भरतीमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्याचबरोबर झाडे पडणे, घरे व भिंती कोसळणे, रेल्वे वाहतुकीवर परिणाम आणि अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, शहरातील कुलाबा पंपिंग स्टेशन येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय प्रतीतनगर मनपा शाळा (मायगाव) येथे ५८ मिमी, एफ/उत्तर विभागात ५२ मिमी, कुलाबा अग्निशमन केंद्रात ४७ मिमी आणि चटकॉप केंद्रात ४७ मिमी पावसाची नोंद झाली.
पूर्व उपनगरात विक्रोळी पश्चिम येथे सर्वाधिक १६६ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल टागोर नगर मनपा शाळा, विक्रोळी येथे १५५ मिमी, पावसपाणी मनपा शाळा, पवई येथे १५४ मिमी, विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे १४८ मिमी आणि वर्धनगर, घाटकोपर येथे १२३ मिमी पाऊस झाला.
पश्चिम उपनगरात सेव्हा लगून येथे १४८ मिमी, जोशीवाडी येथे १२८ मिमी, चकाला मनपा शाळा, अंधेरी येथे १२७ मिमी, अंधेरी अग्निशमन केंद्रात १२५ मिमी आणि के/पश्चिम विभाग कार्यालयात १२४ मिमी पावसाची नोंद झाली.
अनेक सखल भाग जलमय
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह दुपारी २.५० वाजता आलेल्या समुद्राच्या भरतीमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. पूर्व उपनगरातील साकीनाका, काजूपाडा-कुर्ला, अशोकनगर-कुर्ला, भांडुप, चेंबूर, पवई आदी भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. पश्चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, गोरेगाव पूर्व आणि दहिसर परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनास्थळी महापालिकेची पथके तैनात असून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
६४ ठिकाणी झाडे पडली
मुसळधार पावसामुळे शहरात झाडे पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरात १०, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात ३६ अशा एकूण ६४ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घरे-भिंती कोसळल्या; तिघे जखमी
शहरात घरे आणि भिंती कोसळण्याच्या एकूण ९ घटना घडल्या. यामध्ये शहरात १, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ५ घटनांचा समावेश आहे.
दुपारी सुमारे १२.२२ वाजण्याच्या सुमारास बेंगणवाडी परिसरातील जी-लाईन रोडवरील प्लॉट क्रमांक २१ येथे तळमजला अधिक एक मजली घर कोसळले. या दुर्घटनेत दोन पुरुष आणि एका महिलेस दुखापत झाली असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम
नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. मध्य रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम उपनगरातील ५ आणि पूर्व उपनगरातील १ अशा एकूण ६ ठिकाणी बेस्टच्या बसमार्गात बदल करण्यात आला.
अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद
अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने चेंबूर येथील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरीतील वीर सावरकर मार्ग, महापालिका बाजारपेठ रस्ता, स्वामी विवेकानंद मार्ग, मुशाफिरी मार्ग, विक्रोळी ह्यूमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच पवई पार्क परिसरातील काही रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भांडुपमध्ये झाड कोसळून कार गटारात
एलबीएस मार्गावरील एशियन पेंट्ससमोर भांडुप (पश्चिम) येथे रस्ता खचल्यामुळे उभे असलेले झाड कोसळले. त्याचवेळी रस्त्यावरील एक कार खड्ड्यात घसरून गटारात गेली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.


