मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट, तर संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे उपाय वेगाने सुरू केले आहेत.
महामुंबईत शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित यंत्रणांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत शाळा आणि महाविद्यालये बंद
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनानेही अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर महापालिका हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ४ आणि ५ जुलै रोजी महापालिकेतील सर्व विभागप्रमुख, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महापालिकेने १२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तातडीने मदत आणि प्रतिसाद दिला जाणार आहे.
आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी घेतला आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे.
रत्नागिरी किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळला आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना आणि मच्छीमारांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र-गोव्यात NDRFची पूर्वतैनाती
मान्सून काळातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) ०५ बटालियनने १ जुलैपासून महाराष्ट्र आणि गोव्यातील संवेदनशील भागांमध्ये पथकांची पूर्वतैनाती केली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, नागपूर आणि उत्तर गोवा येथे ही पथके संपूर्ण मान्सून काळात सज्ज राहणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, नदी-नाले आणि समुद्रकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.


