मुंबई प्रतिनिधी
मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांची घोषणा केली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यांमध्ये रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत असणारी पोलिसांची गस्त सकाळी ८ वाजेपर्यंत वाढविण्यात येणार असून, रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणारे गर्दुल्ले, सोनसाखळीचोर, पाकिटमार आणि जामिनावर सुटलेले सराईत गुन्हेगार यांच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
मुंबई लोकलमधील सुरक्षेच्या प्रश्नावर झालेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कदम यांनी सांगितले की, रेल्वे पोलीस, राज्य गृह विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची पुढील १५ दिवसांत उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन अंमलबजावणीचा आराखडा निश्चित केला जाईल.
ही चर्चा २३ जून रोजी नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर झाली. या घटनेनंतर लोकलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लक्षवेधी सूचना मांडताना आमदार रवींद्र फाटक यांनी रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. स्थानक परिसरात वाढलेल्या असामाजिक घटकांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना (ठाकरे)चे आमदार अॅड. अनिल परब यांनी रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचा वाढता उपद्रव आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमदार भाई जगताप यांनी गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांकडे सरकारचे लक्ष वेधले, तर आमदार राजहंस सिंह यांनी प्रत्येक रेल्वे डब्यात सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर आमदार चित्रा वाघ यांनी महिला डब्यातील पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली. त्यास प्रतिसाद देताना गृहराज्यमंत्री कदम यांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत, गस्तीची वेळ सकाळी ८ वाजेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली.
सरकारने रेल्वे स्थानके आणि रेल्वे मार्गांवरील अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोनसाखळीचोर, पाकिटमार आणि जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी उपलब्ध गुन्हेगारी नोंदींचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून सर्व स्थानकांवर तपासण्या अधिक तीव्र करण्यात येतील. अपघातप्रवण रेल्वे स्थानकांची स्वतंत्र पाहणी करून तेथे अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत.
१७ महिन्यांत २,२८८ मृत्यू; अपघात रोखण्याचे आव्हान कायम
सभागृहात रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येचाही मुद्दा उपस्थित झाला. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५ ते मे २०२६ या १७ महिन्यांच्या कालावधीत रेल्वे अपघातांत २,२८८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये १,८९५, २०२४ मध्ये १,७४४ आणि २०२५ मध्ये १,६१२ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सरकारने लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यासह जास्तीत जास्त १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधला जात असल्याचे स्पष्ट केले.
६,८९९ सीसीटीव्ही, १,५२० होमगार्ड तैनात
मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी १७७ रेल्वे स्थानकांवर ६,८९९ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. रेल्वे पोलिसांना मदत करण्यासाठी २,००० होमगार्ड आणि १५० महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) जवान मंजूर असून, सध्या १,५२० होमगार्ड आणि ११२ एमएसएफ जवान प्रत्यक्ष सेवेत कार्यरत आहेत.
रेल्वे स्थानकांवर दृश्यमान पोलिस गस्त वाढविण्यात आली असून, संशयित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी चेहरा पडताळणीसह आधुनिक तांत्रिक यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. प्रत्येक स्थानकावर संशयास्पद बॅगांची तपासणी केली जात असून प्रमुख टर्मिनस स्थानकांवर स्कॅनरद्वारे सामानाची तपासणी सुरू आहे.
आपत्कालीन मदतीसाठी कार्यरत असलेल्या १५१२ हेल्पलाईनवर आतापर्यंत १ लाख ५६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याद्वारे ५३ हजार प्रवाशांना सुमारे ४ कोटी ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात आल्याची माहितीही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली.


