मुंबई प्रतिनिधी
राज्यातील वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (३ जुलै) दुपारी १२.३० वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. अलीकडील पक्षांतरांच्या मालिकेनंतर ठाकरे प्रथमच माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडणार असल्याने या पत्रकार परिषदेकडे राज्यासह राष्ट्रीय राजकारणाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेल्या सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी गटाची वाट धरल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. सलग होत असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे राहिले असून त्यावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील फोडाफोडीचे राजकारण, जनादेशाचा सन्मान, पक्षनिष्ठा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती तसेच संघटनात्मक पुनर्बांधणी या विषयांवर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर ते थेट टीका करणार का, तसेच पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबतही या पत्रकार परिषदेत संकेत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना ठाकरे गटातील नेत्यांचे पक्षांतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याबरोबरच पक्षाची पुढील वाटचाल स्पष्ट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतून होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील विरोधी राजकारणाची दिशा, महाविकास आघाडीतील समन्वय आणि आगामी निवडणुकांतील रणनीतीबाबतही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद ही राज्याच्या राजकीय घडामोडींतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.


