मुंबई प्रतिनिधी
मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत आणखी एका दुर्दैवी दुर्घटनेने शहर हादरले आहे. साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चालत असताना एक नागरिक थेट सुमारे २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव अन्सारी असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वीच चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच साकीनाक्यातील या दुर्घटनेने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मोबाईलवर बोलत असतानाच घडला अनर्थ
प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ संबंधित व्यक्ती मोबाईलवर बोलत चालत होती. त्याचवेळी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने ती व्यक्ती थेट त्यामध्ये कोसळली. संबंधित ठिकाणी खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, पुरेशा सुरक्षेची उपाययोजना किंवा प्रभावी इशारा नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
छत्री आणि चप्पल सापडली; पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्याला अडथळे
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, साकीनाका पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात आली.
शोधकार्यादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल मॅनहोलजवळ आढळून आली. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ती व्यक्ती प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले होते.
शोधकार्य सुरू असतानाच मृत्यूची दुर्दैवी माहिती
शोधमोहीम सुरू असतानाच स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पाण्याचा वेग अत्यंत तीव्र असल्याने व्यक्तीला वाचविण्याची शक्यता अत्यल्प होती. अखेर अन्सारी यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.
महापौरांच्या पाहणीनंतरही दुर्घटनांची मालिका कायम
काही आठवड्यांपूर्वीच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती. त्या पाहणीदरम्यान महापौरांसमोरच एक पालिका कर्मचारी खड्यात पडल्याची घटना घडली होती. त्यानंतरही शहरातील धोकादायक ठिकाणांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप होत आहे.
चेंबूरमधील झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू आणि आता उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू या सलग दोन गंभीर घटनांमुळे मुंबईतील पावसाळी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात उघडे मॅनहोल, खराब रस्ते आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच पावसाळ्यात शहरातील सर्व उघडे मॅनहोल तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या घटनेतून कोणता धडा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


