मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात वेगाने घडणाऱ्या घडामोडींमध्ये आणखी एका महत्त्वाच्या अध्यायाची भर पडली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी महायुतीचे उमेदवार सचिन अहिर यांची बुधवारी एकमताने आणि बिनविरोध निवड झाली. काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अहिर यांच्या निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. त्यामुळे कोणत्याही मतदानाची आवश्यकता न पडता त्यांची निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवड ही केवळ संसदीय प्रक्रिया नसून राज्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. महायुतीने उमेदवार म्हणून सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर विरोधकांनीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने सभागृहात सहमतीचे वातावरण पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन; विरोधकांचेही मानले आभार
सचिन अहिर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत विरोधी पक्षांचेही विशेष आभार मानले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विरोधकांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “अहिर म्हणजे निर्भीड. सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच निर्भीडपणे काम केले आहे. या सर्वोच्च घटनात्मक पदावर ते निष्पक्षपणे काम करत सभागृहातील सर्व सदस्यांना न्याय देतील, असा मला विश्वास आहे.”
शिंदेंची खास शैलीतील शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “त्यांच्या नावात सचिन आहे. एक सचिन क्रिकेटच्या मैदानात नाव कमावून निवृत्त झाला, तर दुसरा सचिन आता पॅड घालून संसदीय मैदानात नवी इनिंग सुरू करणार आहे.”
यानंतर त्यांनी शायरीच्या माध्यमातूनही शुभेच्छा देत म्हटले, “तुफान में जो शांत रहे उसे समुंदर कहते हैं, जो सबके दिल पर राज करते हैं, उसे सिकंदर कहते हैं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
एका दिवसात राजकीय प्रवासाला नवे वळण
सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीला गेल्या दोन दिवसांत मोठे वळण मिळाले आहे. मंगळवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आणि बुधवारी त्यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादीपासून शिवसेनेपर्यंतचा प्रवास
मुंबईतील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. राष्ट्रवादीत त्यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली तसेच राज्य सरकारमध्ये मंत्रिपदही भूषविले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती. पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी ठाकरे यांची साथ कायम ठेवली होती. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आता विधान परिषदेच्या उपसभापतीपदापर्यंत मजल मारली आहे.
महायुतीसाठी महत्त्वाचा राजकीय संदेश
सचिन अहिर यांची बिनविरोध निवड ही महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विरोधकांनी उमेदवार मागे घेतल्याने सभागृहात सहमतीचा संदेश गेला असून, संसदीय कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नव्या जबाबदारीत सचिन अहिर सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे हाताळतील, असा विश्वास सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी व्यक्त केला आहे.


