मुंबई प्रतिनिधी
चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्या विहान श्रीवास्तव याच्यावर बुधवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विहानला त्याच्या आवडत्या क्रिकेटच्या बॉलसह अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते, तर विहानची आई जुही मुलाची क्रिकेट बॅट छातीशी कवटाळून हंबरडा फोडत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
अवघ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत मैदानावर क्रिकेट खेळत मोठे स्वप्न पाहणारा विहान आता कायमचा निघून गेल्याची वेदना त्याच्या कुटुंबीयांना असह्य झाली आहे. अंत्यसंस्कारावेळी विहानच्या पार्थिवासोबत क्रिकेटचा बॉल ठेवण्यात आला. क्रिकेटप्रती असलेल्या त्याच्या प्रेमाची ही अखेरची आठवण ठरली.
कुटुंबीयांनी सांगितले की, विहानला क्रिकेटची प्रचंड आवड होती. भविष्यात व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे मोठे स्वप्न होते. शाळेनंतर तो नियमित क्रिकेटचा सराव करत असे. मात्र एका दुर्दैवी अपघाताने त्याची सर्व स्वप्ने कायमची अधुरी राहिली.
दरम्यान, विहानच्या आईला अजूनही मुलाच्या निधनावर विश्वास बसत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ती घरी मुलाची क्रिकेट बॅट छातीशी कवटाळून बसत असून, “विहान आता खेळायला जाईल,” असे वारंवार म्हणत असल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमके काय घडले?
चेंबूरमधील ११ नंबर रोड परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. झाड थेट बसच्या छतावर पडल्याने बसचा वरचा भाग अक्षरशः चिरडला गेला. या भीषण दुर्घटनेत विहान श्रीवास्तव याचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. ही बस टिळकनगर येथील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर मुंबईतील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक वृक्षांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, विहानच्या अंत्यसंस्कारावेळी उमटलेले दृश्य उपस्थितांच्या मनाला चटका लावणारे ठरले. क्रिकेटची स्वप्ने पाहणाऱ्या त्या चिमुरड्याला क्रिकेटच्या बॉलसह अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसर हळहळून गेला.


