मुंबई प्रतिनिधी
मुंबई, उपनगरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि पालघर परिसरात आज सकाळ पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दुपारी १२.३० वाजता जारी करण्यात आलेल्या ‘नाऊकास्ट’ इशाऱ्यानुसार, पुढील तीन तासांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनानेही सर्व यंत्रणा सतर्क ठेवत आपत्कालीन पथके तैनात केली आहेत.
मुंबईत सखल भाग जलमय; वाहतुकीवर मोठा परिणाम
गेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सबवे, सायन, कुर्ला, दादर, घाटकोपर, चेंबूर, परळ, हिंदमाता, किंग्ज सर्कल आदी सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली, तर अनेक रस्त्यांवर वाहने संथगतीने सरकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून पंपिंग स्टेशनही पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली आहेत.
लोकल सेवा सुरू; मात्र वेगावर मर्यादा
मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वे सेवा सुरू असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी गाड्या कमी वेगाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. बेस्टच्या काही बसमार्गांमध्येही बदल करण्यात आले असून काही मार्गांवरील सेवा तात्पुरती विस्कळीत झाली आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसाची जोरदार बॅटिंग
ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील कटाई नाका परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. परिस्थिती गंभीर झाल्याने बदलापूर-कटाई मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबईत रस्ते जलमय; वाहतूक कोंडी
सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका नवी मुंबईला बसला आहे. वाशी, नेरुळ, बेलापूर, घणसोली, ऐरोली, कोपरखैरणे यांसह अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले. ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा
पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून किनारपट्टी आणि डोंगराळ भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
सखल भाग, पूल आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळावे.
समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे.
झाडे, जीर्ण इमारती आणि विद्युत खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
पुढील काही तास महत्त्वाचे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तास मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भरतीची वेळ आणि सततचा पाऊस यामुळे सखल भागांत पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


