सातारा प्रतिनिधी
जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पुष्प पठारावरील आगामी पुष्प हंगाम यशस्वी करण्यासाठी वन विभागाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी नुकताच कास परिसराचा दौरा करून सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह यंदाचा पुष्प हंगाम अधिक नियोजनबद्ध आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकारी व समिती सदस्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दौऱ्यादरम्यान त्यांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या आकर्षक स्वागत कमानीची पाहणी केली. तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक वॉशरूमची पाहणी करून त्याच्या गुणवत्तेची माहिती घेतली. बघदरतळे ते मंडपगड या मार्गावरील नव्याने विकसित करण्यात आलेल्या पायवाटांचीही त्यांनी तपासणी केली. कुमुदिनी परिसरातील वॉच टॉवर, कासानी पार्किंग तसेच कास तलावाजवळील वाहनतळाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटकांच्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कास पठार संवर्धन समितीमार्फत पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि परिसरातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. आगामी पुष्प हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता, सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष पाटील, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, बामनोली वनपाल उज्वला थोरात, वनरक्षक समाधान वाघमोडे, वनरक्षक प्रकाश शिंदे तसेच समितीचे सदस्य प्रदीप कदम, दत्तात्रय किर्दत यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘सातारेन्सीस’च्या आगमनाची उत्सुकता
यंदा जून महिन्यात तुलनेने कमी पाऊस झाला असला तरी कास पठारावर हिरवाईची चादर पसरू लागली आहे. सातारची ओळख बनलेले दुर्मीळ ‘सातारेन्सीस’ हे फूल लवकरच उमलण्यास सुरुवात होणार असून त्याची निसर्गप्रेमींना मोठी उत्सुकता आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्टपासून कास पठार विविधरंगी रानफुलांच्या मनमोहक गालिच्याने फुलून जाण्याची अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात फुलांचा बहर शिगेला पोहोचत असून देश-विदेशातील हजारो पर्यटक या अद्भुत नैसर्गिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी कासला भेट देतात.
यंदाही पर्यटकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक अनुभव देण्यासाठी वन विभाग आणि कास पठार संवर्धन समितीने व्यापक नियोजन हाती घेतले असून, आगामी पुष्प हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.


