पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासातील अनेक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपासादरम्यान आलेला भावनिक आणि धक्कादायक अनुभव व्यक्त केला.
“पीडित चिमुरडीचा मृतदेह पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. एक आई म्हणून त्या क्षणी झालेल्या वेदना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. आरोपीने अत्यंत विकृत आणि अमानुष कृत्य केले होते,” असे पवार यांनी सांगितले.
१ मे २०२६ रोजी आरोपीने वासरू दाखवण्याच्या आणि खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणात अवघ्या १६ दिवसांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करणे हे मोठे आव्हान होते, असे पवार यांनी नमूद केले. त्यानंतर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटल्याची सुनावणी होऊन सुमारे दोन महिन्यांत निकाल लागला.
तपासादरम्यान आरोपीमध्ये कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप दिसून आला नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. “समाजात अशा विकृत प्रवृत्तीला कोणतीही जागा नाही. अशा गुन्ह्यांचा कठोर आणि वेगवान तपास करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणात न्यायालयाने अपहरण, लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि हत्येच्या गंभीर गुन्ह्यांबाबत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे बालकांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद तपास आणि प्रभावी न्यायप्रक्रियेचा संदेश गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


