मुंबई,पुणे प्रतिनिधी
भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे राज्यभरातून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे मत व्यक्त केले.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी सोमवारी कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. यापूर्वी २५ जून रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. अल्पावधीत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यात आल्याने या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री फडणवीस : समाजात अशा नराधमांना स्थान नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, “न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. न्यायालयाचे मनापासून आभार,” अशी प्रतिक्रिया दिली.
नसरापूर प्रकरणी अखेर फाशीची शिक्षा!
नसरापूर प्रकरणातील निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मा. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मुख्यमंत्री… pic.twitter.com/hrD1cXWUd6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2026
या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांचे तसेच सरकारी पक्षाचे विशेष कौतुक त्यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. विक्रमी कालावधीत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागल्याबद्दल तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
एकनाथ शिंदे : ‘हा निकाल भविष्यासाठी बेंचमार्क ठरेल’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत न्यायाधीशांचे अभिनंदन केले. “तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्येसारखे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण होते. मात्र न्यायालयाने अत्यंत जलद गतीने निर्णय देत न्याय दिला. हा निकाल भविष्यातील अशा प्रकरणांसाठी बेंचमार्क ठरेल,” असे ते म्हणाले.
Eknath Shinde Live । विधान भवन, मुंबई राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन – पत्रकारांशी संवाद https://t.co/HOxYV7afMQ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 29, 2026
पोलिसांनी अवघ्या दोन आठवड्यांत दोषारोपपत्र दाखल करून तपासात कसूर केली नाही, असे नमूद करत शिंदे म्हणाले, “जनभावना लक्षात घेऊन पोलिसांनी अत्यंत भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. त्यामुळे आरोपीला कायद्यातील कोणतीही पळवाट मिळाली नाही. न्यायाधीशांनीही याचा उल्लेख आपल्या निर्णयात केला.”
“अशा अमानुष कृत्य करणाऱ्या व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, हे आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. या शिक्षेमुळे भविष्यात अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल आणि अशा गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसेल,” असेही त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार : न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट करणारा असल्याचे म्हटले.
आपल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च… pic.twitter.com/mjhWoPSwRs
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) June 29, 2026
“नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला आणि मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“या प्रकरणात न्याय मिळाला असला तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी समाज आणि प्रशासन या दोघांनीही अधिक सजग राहण्याची गरज आहे. बलात्कार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही,” असेही त्या म्हणाल्या.
आदिती तटकरे : निकालाला आव्हान देण्याचा विचारही होऊ नये
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. “अशा प्रकारचा कठोर निर्णय न्यायालयाने अनेक वर्षांनंतर दिला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि क्रूरता लक्षात घेऊन हा निकाल देण्यात आला आहे. एक स्त्री म्हणून मला वाटते की या निर्णयाविरोधात कोणत्याही स्तरावर आव्हान देण्याचा विचारही होऊ नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
जलद तपास आणि सुनावणीची राज्यभर चर्चा
नसरापूर येथील या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करून अल्पावधीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर विशेष न्यायालयानेही प्रकरणाची दैनंदिन सुनावणी घेत जलदगतीने निकाल दिला. त्यामुळे हा खटला न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणांत तातडीने न्याय मिळू शकतो, असा संदेश या निर्णयातून गेल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.


