पुणे प्रतिनिधी
राज्याच्या लोककला आणि तमाशा परंपरेचा सातत्याने पुरस्कार करणारे ज्येष्ठ लोककलावंत तथा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रघुवीर खेडकर यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. लोककलावंतांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अनुपस्थितीवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच एका महिन्याच्या आत राज्य सरकारने भव्य लोककला संमेलन आयोजित करावे, अन्यथा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि समता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (२८ जून) लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते, तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचीही प्रमुख उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, दोन्ही नेते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने संमेलनात उपस्थित लोककलावंतांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर रघुवीर खेडकर यांनी व्यासपीठावरून सरकारवर थेट हल्लाबोल केला.
खेडकर म्हणाले, “आज मला एका गोष्टीचा सर्वाधिक खेद वाटतो. ज्यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते, तेच येथे आले नाहीत. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री कार्यक्रमाला का आले नाहीत? त्यांच्याकडे एवढे कोणते काम होते की लोककलावंतांसाठी वेळच मिळाला नाही? पुन्हा मला कधीच बोलावले नाही तरी चालेल, पण हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही.”
लोककलावंतांकडे आजही दुय्यम नजरेने पाहिले जाते, असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. “राज्याचे सर्वेसर्वा असलेल्या मुख्यमंत्री यांनी एखादे काम पुढे ढकलले असते तर काही बिघडले नसते. पण लोककलावंतांचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व वाटले नाही. अजूनही आम्हाला गावकुसाबाहेरचेच समजले जाते. आजची त्यांची अनुपस्थिती हे त्याचेच प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्री येऊ शकले नसतील, पण निदान सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी उपस्थित राहायला हवे होते. त्यांच्याकडे कामे कायमच असणार आहेत. मग लोककलावंतांसाठी वेळ नेमका कधी काढणार? सरकारने एका महिन्याच्या आत आणखी एक लोककला संमेलन भरवावे. तसे झाले नाही तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेईन,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी चित्रपट आणि नाट्य क्षेत्राला मिळणाऱ्या प्राधान्याचाही उल्लेख केला. “चित्रपटांच्या कार्यक्रमांना, नाट्य संमेलनांना तुम्ही तातडीने जाता. तेव्हा वेळ असतो. पण लोककलावंतांच्या कार्यक्रमासाठी वेळ नसतो का? आम्ही कलाकार नाही का? आमच्याकडे कला नाही का? आमच्या कलेचा आणि आमच्या आयुष्याचा सन्मान कोण करणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधताना खेडकर यांनी तमाशा क्षेत्रातील अनेक समस्या मांडल्या. “लोकशाहीर विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी मी गेली १५ वर्षे पाठपुरावा करीत आहे. तरीही स्मारक उभे राहत नाही. तमाशा कलावंतांना वेळेवर मानधन मिळत नाही. तमाशा फडांवर वारंवार हल्ले होतात. मात्र, या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. कारण हे कलाकार गोरगरीब आहेत, आंदोलन करणारे नाहीत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यापुढे लोककलावंतांच्या सन्मानाचा प्रश्न दुर्लक्षित होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. “याच पुणे शहरात मोठ्या सभागृहात पुन्हा लोककला संमेलन भरवले गेले पाहिजे. सरकारने लोककलावंतांना योग्य सन्मान दिला नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन. त्यासाठी माझ्यावर कारवाई झाली तरी मी मागे हटणार नाही,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.
रघुवीर खेडकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सांस्कृतिक वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले असून, लोककलावंतांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण कलाक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

