विरार प्रतिनिधी
पार्किंगच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अल्पावधीतच हिंसक वळणावर गेल्याने विरारमध्ये १५ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरार पूर्वेतील कारगिल नगर परिसरात घडलेल्या या घटनेत शहीद शाह (वय १५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
विरारमध्ये पार्किंगच्या कारणावरून एका १५ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना #VirarNews #Virarattack #Virarknifeattack pic.twitter.com/14fPfkLn5j
— Manjiri (@mayuri17976) June 26, 2026
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारगिल नगरमधील गणेश चौक परिसरातील महाकाली अपार्टमेंट येथे वाहन पार्किंगवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याच वेळी एका व्यक्तीने संतापाच्या भरात धारदार चाकूने शहीद शाह याच्यावर हल्ला केला. पोटात चाकूचा वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी मुलाला विरार पूर्वेतील रेडिएंट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्किंगसारख्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे विरार परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही दिवसांत घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विरारमधील ही घटना विशेष चिंतेची ठरत आहे. क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


