मुंबई प्रतिनिधी
पश्चिम द्रुतगती मार्गावरील टीचर्स कॉलनी बसथांब्याजवळील भुयारी मार्गात पुन्हा एकदा पाणी साचल्याने नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात याच भुयारी मार्गाची तीच दयनीय अवस्था होत असताना संबंधित यंत्रणा मात्र केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या सुविधांचा प्रत्यक्षात उपयोग होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मंगळवारी रात्री झालेल्या पावसानंतर भुयारी मार्गात तब्बल दोन ते तीन फूट पाणी साचले. परिणामी हा मार्ग पूर्णपणे बंद करावा लागला. शेकडो विद्यार्थी, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना पर्यायी उंच उड्डाण पुलाचा मार्गांचा वापर करावा लागला. विशेष म्हणजे, या परिसरात कार्डिनल ग्रेसेस स्कूल, महात्मा गांधी विद्यामंदिर आणि न्यू इंग्लिश स्कूल यांसारख्या प्रमुख शाळा, तसेच शासकीय वसाहतीतील आरोग्य केंद्राचा ही स्थानिक नागरिकांना मोठा वापर या भुयारी मार्गाचा होत असल्याने दररोज हजारो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पालक स्थानिक नागरी या भुयारी मार्गाचा वापर करतात.
स्थानिकांच्या मते, “थोडासा पाऊस जरी झाला तरी हा भुयारी मार्ग जलमय होतो. पालिका दरवर्षी पाणी उपसण्याची मोहीम राबवते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात नागरिकांना त्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.”
उड्डाणपूल की जाहिरातींचे प्रदर्शन केंद्र?
या परिसरात उभारण्यात आलेल्या पादचारी उड्डाणपुलाबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेला हा पूल आता डिजिटल जाहिरातींच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्याने त्याचे मूळ उद्दिष्टच हरवले असल्याची टीका होत आहे.
“हा उड्डाणपूल नागरिकांसाठी बांधला आहे की जाहिरातदारांसाठी?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधेचे खुलेआम व्यावसायिकीकरण सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
पुलावर बेवारस सिलेंडर; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
उड्डाणपुलावर अनेक दिवसांपासून दोन गॅस सिलेंडर बेवारस अवस्थेत पडून असल्याचेही समोर आले आहे. हे सिलेंडर रिकामे आहेत की भरलेले, याची कोणतीही माहिती उपलब्ध नसताना संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होणे गंभीर बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करत तातडीने या सिलेंडरची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कायमस्वरूपी उपाय कधी?
दरवर्षी पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचते, मार्ग बंद होतो, पालिका पाणी उपसते आणि काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे “तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार?” हा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि पालकांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नागरिकांची सोय आणि सार्वजनिक पैशांचा वापर या सर्वच मुद्द्यांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाचा प्रत्येक हंगाम सुरू होताच या भुयारी मार्गाचे जलतरण तलावात रूपांतर होत असेल, तर विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.


